श्री महालक्ष्मी नेत्रोपचार केंद्र
परमेश्वराने निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीला पाहण्यासाठी त्याने मानवाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे डोळे होय. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वयाची पहिली दहा वर्षे डोळ्यांच्या वाढीसाठी फार महत्वाची असतात त्यामुळे त्यांची योग्य वाढ झाली नाही तर ते कायमचे कमजोर होतात आणि वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे त्यांची आधीच योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. अलीकडे संगणक, टीव्ही व मोबाईलच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. कोणत्याही वयात या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. मोतीबिंदू, काचबिंदू, चष्मा लागणे, दृष्टी कमजोर होणे, डोळे कोरडे होणे किंवा लाल होणे अशा डोळ्यांच्या अनेक समस्या जाणवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. डोळे फार अमूल्य आहेत त्यामुळे डोळ्यांच्या आजाराबाबत कोणतीही तडजोड न करता त्यांची नियमित काळजी घेऊन दृष्टीचे रक्षण करणे महत्वाचे आहे. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने श्री महालक्ष्मी नेत्रोपचार केंद्राची स्थापना केली. प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.कीर्ती ढवळे (एम.बी.बी.एस.डी.ओ.एम.एस.) यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरु आहे.
या केंद्रात कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी करून चष्म्याचा नंबर काढला जातो आणि मोतीबिंदू व इतर आजारांचे निदान केले जाते. त्याचप्रमाणे या केंद्रात अल्पदरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते. चष्मा तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चात ३० ते ४० % सवलत दिली जाते. या केंद्रात आतापर्यंत ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली असून ५६ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत तर २२५ लोकांनी सवलतीच्या दरात चष्मे बनवून घेतले आहेत. याशिवाय या केंद्रात डोळ्यांच्या आरोग्याबाबत योग्य ते मार्गदर्शनही केले जाते. हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या कौतुकास पात्र ठरला आहे. समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे अभिनंदन केले जात आहे.