महाकुंकूमार्चन सोहळा

महाकुंकूमार्चन सोहळा

सर्व दानात श्रेष्ठ असलेल्या अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊन परगावच्या भाविकांना मोफत भोजनप्रसाद देण्यासाठी सन २००८ साली श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ची स्थापना झाली. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त संस्थेतर्फे सकल सौभाग्यादायी महाकुंकुमार्चन उपासनेचे आयोजन केले जाते. कारण दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या कोल्हापूर येथे अनादिसिद्ध श्री महालक्ष्मीचा अखंड निवास आहे. हे सतीमातेचे आद्य त्रिनेत्रपीठ असून साडेतीन शक्तिपीठातील प्रथमपीठ आहे. वैकुंठातून आलेल्या श्रीलक्ष्मीचे हे वसतीस्थान असल्यामुळे येथे केलेल्या उपासनेचे फळ अनंतपट मिळते.

विविध उपासनांमध्ये कुंकुमार्चन ही सुख व सौभाग्यदायक उपासना आहे. यामुळेच दरवर्षी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सकल सौभाग्यदायी कुंकुमार्चन उपासनेचे आयोजन केले जाते. यावर्षी संस्थेने आपला १२ वा वर्धापन दिन साजरा केला. याचे औचित्य साधून भव्य असे कुंकुमार्चन आयोजित केले. महालक्ष्मी मंदिर पूर्व दरवाजा आणि भवानी मंडप परिसर या ठिकाणी ही महाकुंकुमार्चन उपासना पार पाडली गेली. या उपासनेत सुमारे ४००० सुवासिनी महिलांनी भाग घेतला. अतिशय धार्मिक व मंगलमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहभागी महिलांनी गुलाबी साडी परिधान केली होती. विविध सौभाग्यालंकार घालून आलेल्या या महिलांनी अतिशय मनोभावे ही उपासना पूर्ण केली. वेदशास्त्रसंपन्न श्री.सुहास मधुकर जोशी व त्यांचे सहकारी श्री.विशाल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपासना पूर्ण झाली.

संस्थेच्या तपपूर्तीचे औचित्य साधून यावेळी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रो चे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील भाग्यवान विजेत्या महिलांना २१ पैठणी साड्या देण्यात आल्या. त्यामुळे समस्त महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून येत होते. भव्य अशा स्टेजचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात येऊन त्या दिवशी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे वातावरण मंगलमय व पवित्र क्षणांनी भरून गेले होते. एवढ्या भव्य प्रमाणात पण अतिशय नेटका व चैतन्यदायी असा सुखद सोहळा आयोजित केल्याबद्दल सगळ्या महिलांनी तसेच नागरिकांनी संस्थेचे कौतुक करून अभिनंदन केले.