शिवभोजन थाळी योजना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या “शिवभोजन थाळी” चा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी झाला. या योजनेद्वारे गरीब व गरजूंना फक्त १० रुपयांत पोषक व ताजे जेवण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवभोजन केंद्रांची स्थापना करण्यात आली. या केंद्रस्थापनेचे निकष असे होते कि, ही केंद्रे जिल्ह्याच्या मुख्य परिसरात गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी असावीत, या केंद्रात सुटसुटीत आसनव्यवस्था असावी, भोजनालय स्वच्छ असावे, पिण्यासाठी स्वच्छ् व फिल्टरड पाणी असावे. स्वयंपाकघरात जेवण बनविताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. या सर्व निकषांवर आपले श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट खरे उतरले आणि सरकारकडून आपली निवड शिवभोजन केंद्र म्हणून झाली. आज ताराबाई रोड येथे श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये हे शिवभोजन केंद्र सुरु आहे हे सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.
गेले वर्षभर हे शिवभोजन केंद्र उत्तमरीत्या सुरु आहे. प्रशस्त अशा हॉलमध्ये स्वच्छ टेबल खुर्च्यांची सोय, उत्कृष्ट दर्जाचे ताजे जेवण, सुयोग्य नियोजन या वैशिष्ट्यांमुळे हे केंद्र लोकप्रिय झाले आहे. गरीब व गरजू लोकांसाठी अल्पदरात केलेली पोटभर भोजनाची सोय हा मायबाप सरकारचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.