रक्तदान शिबीर
रक्तदान हे महादान आहे. गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे. सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे. थेलेसिमिया आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. अभ्यासानुसार महाराष्ट्रात दररोज सर्व प्रकारच्या ४५०० ते ५००० रुग्णांना रक्ताची गरज लागते. पण त्या प्रमाणात रक्तपुरवठा फार कमी होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच रक्तदानाच्या या महाचळवळीत सहभागी होऊन आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करतो.
यावर्षीही श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अशोक अनंतराव मेवेकरी यांचे स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उच्चांकी ३५६ बाटल्यांचे संकलन झाले. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सदर शिबिरासाठी अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्य मिळाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.