त्र्यंबोली यात्रा – मोफत बससेवा
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पंचमीला ललिता पंचमी म्हणून ओळखतात. या दिवशी श्री अंबाबाई आपल्या पालखीतून आपल्या सखीच्या म्हणजे श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी त्र्यंबोली टेकडीवर जाते. या पालखीमार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांचे गालीचे घातले जातात. पालखीचे भाविकांकडून औक्षण केले जाते. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. देवीची पालखी त्र्यंबोली टेकडीवर गेल्यानंतर कोहळापूजन व भेदन केले जाते. या विधीला खूप धार्मिक महत्व आहे. हे सर्व पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी तिथे भाविकांची खूप गर्दी असते. त्या दिवशी तिथे यात्रा भरते. विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टोल, मुलांसाठी खेळण्याची विविध साधने अशा खूप गोष्टी या यात्रेत असतात. या दिवशी सर्व भाविकांना तिथे जाता यावे यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे मोफत बससेवा देण्यात येते. या उपक्रमामुळे भाविकांची त्र्यंबोली यात्रेला जाण्याची उत्तम सोय होते. या वर्षीही संस्थेतर्फे भाविकांना त्र्यंबोली यात्रेला जाण्यासाठी मोफत बससेवा देण्यात आली. समस्त भाविकांकडून या सेवेबद्दल समाधानपूर्वक संस्थेचे आभार मानले गेले.